वेद आणि विज्ञान – २

देवांच्या पूर्वी अव्यक्तापासून व्यक्त सृष्टी निर्माण झाली, ह्यात एकाला अव्यक्त मानले आहे. अनेक ऋषीमुनींनी अशा प्रकारची मते मांडली पण सर्वांचे मूळ एकच असावे असे मानले जाते. वेदांचा महत्वाचा सिद्धांत ह्या एकाशी निगडीत आहे.

सुरवातीला चित्रांकित अक्षर / संख्या वाचन होत असे. नंतर संख्येसाठी अक्षरे वापरली जाऊ लागली, जसे क = १, ख = २ ग = ३ इत्यादी. शब्दांनी संख्या मांडण्याची पद्धत देखील होती. ही पद्धत फार महत्वपूर्ण होती; आकाश = ०, पृथ्वी किंवा धरा = १, नेत्र = २ काळ = ३ (वर्तमान, भूत आणि भविष्य), वेद = ४, बाण / महाभूते = ५, रस / वेदांग /ऋतु = ६, पर्वत / ऋषी, सूर्याचे घोडे = ७, गज / वसु = ८, नवग्रह = नऊ, रुद्र = ११, सूर्य = १२, विश्वे = १३, विद्या = १४, तिथी = १५, कला = १६, अंतेष्टी = १७, श्रुति = १८, अतिधृती = १९, नखे = २०; अशाप्रकारे अंक लिहिताना अंकानाम् वामतो गतिः| हे सूत्र वापरले जात असे; आकाश-वेद-रस-वसू असे लिहिलेले असेल तर आकड्यांमध्ये ती संख्या म्हणजे ८६४०.

नऊ ह्या संख्येनंतर एकाच्या पुढे शून्य मांडून दहा ह्या संख्येचा विचार झाला, शोध लागला; दशमान पद्धतीचा शोध लागला; मोठाल्या संख्या लिहिता येऊ लागल्या; दहाच्या पटीत लिहिता येऊ लागल्या, त्यापद्धतीने त्यांची कोष्टके तयार होऊ लागली. आकड्यांचा हा शोध वेदपूर्व काळातील असला पाहिजे. त्याकाळातील भारतीय तज्ञ परार्धा (१०१८) पर्यंतची गणिते करत असत.

काळ मापनाचे हे कोष्टक पहा

परमाणु = १/३०३७५ सेकंद

२ परमाणु = १ अणु = ८/१२१५०० सेकंद

३ अणु = त्रीरेणु = ८/४०५०० सेकंद

३ त्रीरेणु = १ त्रुटी = ८/१३५०० सेकंद

१०० त्रुटी = १ वेध = ८/१३५ सेकंद

३ वेध = १ लव = ८/४५ सेकंद

३ लव = १ निमेश = ८/१५ सेकंद

३ निमेश = १ क्षण = ८/५

५ क्षण = १ कण = ८ सेकंद

१५ कण = १ लघु = १२० सेकंद = २ मिनिटे

१५ लघु = १ नाडी = ३० मिनिटे

२ नाडी = १ मुहूर्त = ६० मिनिटे = १ तास

३ मुहूर्त = १ प्रहर = ३ तास

८ प्रहर = १ अहोरात्र = २४ तास

३० अहोरात्र = १ महिना

६ महिने = १ अयन

२ अयन = १ वर्ष

अशा पद्धतीने उपयुक्तते नुसार निरनिराळी कोष्टके बनवलेली असत. गणित शास्त्र इतके विकसित असेल तर इतर शास्त्रेही तशाच प्रकारे विकसित झाली असली पाहिजेत. कण्व गोत्री मेधातिथीने ऋग्वेदात गणिताचा विचार प्रथम मांडला. अर्थात गणिताचा विकास त्याच्याही बराच आधी झालेला होता. मेधातिथीने संख्यांचा विचार परार्धापर्यंत (१०१८) नेला. ऋग्वेद आणि यजुर्वेदात त्याचे उल्लेख आढळतात. मेधातिथी बरोबरच आणि त्याच्या नंतरच्या काळात अनेक ऋषींनी गणिताच्या विकासाला हातभार लावला आहे. देवातिथी, ब्राह्मातिथी, वत्स, पुनर्वास्त, सासकर्ण, प्रगथ, परवत नारद, गोसुक्त, अश्वसुक्ती, इरमाभिती, सौभारी, निपार्तिथी, नभक, त्रिशोक, श्रुतीगु, आयु, मेध्या, मातरीश्व, कृश, परशधरा, सुपर्णा, कुरुसुति, कुशिदी, प्रासकण्व इत्यादी गणित तज्ञांची नावे आढळतात.

वेदांमध्ये दहा व त्यापटीत येणाऱ्या संख्यांचा अगदी परार्धा पर्यंतच्या संख्यांचा विचार मांडला आहे. त्यागोदर मोठ्या संख्या ह्या चित्रवल्ली, शब्दवल्लीत सर्व जगभर मांडल्या जात असत. दशमान पद्धतीने संख्या मांडणे फार सोपे झाले आणि त्याचे श्रेय हे ह्या मेधातिथीचे आहे. एकावर शून्य लिहून नऊच्या पुढे संख्या मांडण्याची दशमान पद्धत ही भारताने जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे.

(क्रमशः)

No Comments

Post a Comment