भारतासह जगभर प्रचलित असलेली ग्रेगोरिअन कालगणना (१ जाने ते ३१ डिसें) हि इ.स. १५९२ पासून वापरत आली. तथापि, त्या कालगणनेला कोणताच शास्त्रीय / खगोलीय आधार नाहीये. सुरवातीच्या काळात १० महिन्यांचे, ३०४ दिवसांचे वर्ष होते, नंतरच्या काळात रोमन सम्राटांनी आपली मर्जीने त्यात बदल केले. ज्युलिअस सीझरच्या नावे ३१ दिवसांचा जुलै महिना आणि ऑगस्टस च्या नावे ३१ दिवसांचा ऑगस्ट महिना आला. पण हे करत असताना, महिन्यांच्या नावाकडे देखील दुर्लक्ष झाले. जुलै आणि ऑगस्ट महिने घुसवायच्या आधी सप्टेंबर म्हणजे सातवा महिना होता ऑक्टोबर आठवा नोव्हेंबर नउवा, आणि डिसेंबर दहावा महिना होता. आता सप्टेंबर हा नउवा महिना आहे. कुठल्या महिन्यात किती दिवस आणि का ह्याला काही नियम / शास्त्रीय आधार दिसत नाही.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण आपल्या राष्ट्रीय भावना स्पष्ट करण्यासाठी अनेक संकल्पना स्विकारल्या. यात राष्ट्रभाषा, राष्ट्रीय ध्वज याचसोबत स्वतंत्र शास्त्रशुध्द वैज्ञानिक कालगणना स्विकारण्याचे ठरले. पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी नोव्हेंबर १९५२ मध्ये सुप्रसिध्द खगोल वैज्ञानिक डॉ. मेघनाद शहा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कालगणना पुर्नरचना समिती नेमली.
पृथ्वीच्या विषुवृत्ताच्या समपातळीत समकेंद्रीय खगोलीय महावर्तुळ म्हणजे वैषुविक वृत्त, आयानिक वृत्त ही दोन ठिकाणी एकमेकास छेदतात त्या अंतराळातील छेदन बिंदूस संपात बिंदू म्हणतात. या बिंदूवर सूर्य आला की पृथ्वीवर दिवस व रात्रीचा कालावधी अगदीच समसमान असतो. भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक १ चैत्र या दिवशी सूर्य हा वसंत संपात बिंदूवर असतो. म्हणून या दिवशी दिवस आणि रात्रीचा कालावधी अगदी समसमान असतो. याच दिवशी वसंतऋतू प्रारंभ होतो. या सर्व शास्त्रीय आणि शुध्द खगोलशास्त्राच्या दृष्टीने हाच दिवस वर्षाचा प्रारंभ करण्याचा सर्वाधिक योग्य दिवस असल्याचे स्पष्ट दिसते व याच आधारावरून डॉ. मेघनाद शहा समितीने भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेचा हा दिवस वर्षाचा प्रारंभ दिवस म्हणून निवडला.
सूर्याच्या भासमान मार्गावरील वसंत संपात ते शरद संपात या दोन बिंदूतील प्रवासाला सूर्याला १८५ दिवस लागतात. तर शरद संपात ते वसंत संपात या प्रवासाला १८० दिवस लागतात. त्यानुसार भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेत प्रारंभीचे वैशाख ते भाद्रपद हे ५ महिने ३१ दिवसांचे असून उर्वरित अश्विन ते फाल्गुन हे ६ महिने ३० दिवसांचे आहेत. दर चार वर्षांनी (लीप इअर) चैत्र महिन्यात ३१ दिवस असतात वर ते वर्ष इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २२ मार्च ऐवजी २१ मार्च पासून सुरु होते.
भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेच्या वर्षारंभाचा आज पहिला दिवस, भारतीय राष्ट्रीय सौर दि.१ चैत्र शके १९४० ही आपली राष्ट्रीय तारीख परंतु आज आपल्या देशात अनेकांना हे माहितच नाही. भारत सरकारने दि. २२ मार्च १९५७ या इंग्रजी दिनांकाच्या दिवशी आपली स्वत:ची शुध्द स्वदेशी आणि शुध्द खगोल वैज्ञानिक भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक १ चैत्र शके १८७९ रोजी अधिकृतपणे स्विकारलेली होती.
हिंदु पंचांग हे चंद्राच्या आकाशातील स्थितीवर आधारलेले आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतांना रोज एका नक्षत्रातून भ्रमण करतो. त्यानुसार एका महिन्यात २७.३ दिवसात तो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. चंद्र महिन्याच्या पोर्णिमेच्या दिवशी ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचे नांव त्या महिन्याला दिलेले आहे. उदा:- चैत्र महिन्यात पोर्णिमेला चंद्र हा चित्रा नक्षत्रात असतो तर वैशाख महिन्यात तो विशाखा नक्षत्रात असतो. आपण आपले सर्व सण व उत्सव चंद्र भ्रमणावरील नक्षत्र व तिथीनुसार हिंदु पंचांगात दिल्याप्रमाणे साजरे करतो. आपले सर्व ऋतु हे सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून आहेत तर सण आणि उत्सव हे चंद्र नक्षत्र व तिथीवर अवलंबून आहेत. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी हिंदु पंचांग तिथी व नक्षत्रानुसार सण व उत्सव साजरे करावेत. मात्र आपल्या रोजच्या व्यवहारात सूर्य भ्रमणावर आधारलेली भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक वापरणे योग्य आहे.
Brief History of Stephen Hawking
8 January 1942 – 14 March 2018
एक ब्रिटीश सैद्धांतिक भौतिकशास्त्र (Theoretical physics), सैद्धांतिक विश्वनिर्मिती (Theoretical Cosmology) अशा सामान्य माणसासाठी अगम्य असणाऱ्या विषयातला एक जागतिक कीर्तीचा विद्वान शास्त्रज्ञ आज हरपला.
स्टीफन हॉकिंग ह्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी लक्षात राहण्यासारख्या आहेत, अगदी त्यांची जन्म तारीख आणि गॅलिलिओ गॅलिलि ह्या महान शास्त्रज्ञाच्या मृत्युची तारीख एकच ८ जानेवारी. फरक फक्त ३०० वर्षांचा. गॅलिलिओचा मृत्यू १६४२ मधे झाला आणि स्टीफनचा जन्म १९४२ मधे झाला. आज १४ मार्च २०१८ ला त्याचा मृत्यू झाला आणि आज अल्बर्ट आईनस्टाईनची १३९वी जयंती आहे.
प्रख्यात गणितज्ञ रॉजर पेनरोज यांनी, तार्यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष एकदा आपल्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला. १९६२ मधे केंब्रिज विद्यापीठातल्या Applied Mathematics and Theoretical Physics विभागात विश्वनिर्मिती बद्दल त्याने आपले संशोधन सुरु केले आणि या प्रबंधावर डॉक्टरेट मिळवली.
डॉक्टरेट मिळायच्या आधीच १९६४ मधे एका व्याख्याना दरम्यान, ब्रिटीश शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉइल आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत नारळीकर ह्यांच्या कार्याला आव्हान दिल्यामुळे स्टीफन हॉकिंग चर्चेत आले. त्या क्षेत्रातील तज्ञांनी तर त्याची दखल घेतली होतीच पण जगभरातील सामान्य माणसाला स्टीफन हॉकिंग लक्षात आले ते त्यांच्या “Brief History of Time” ह्या पुस्तकामुळे.
नंतर स्टीफन हॉकिंग ह्यांनी कृष्णविवर ह्या विषयावर संशोधन करायला सुरवात केली. क्वांटम मेकॅनीक्स आणि आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत ह्याची सांगड घालून काही गृहिते मांडली. प्रत्यक्षात MND मुळे शारीरिक हालचाली करणे अवघड होत होते तरी अशी क्लिष्ट गणिते केवळ मनात करून त्यांनी आपल्या ह्या प्रबंधावर कार्य सुरु ठेवले. सुरवातीला अनेक तज्ञांनी ह्या प्रबंधाला विरोध केला होता पण नंतर ती मते पटल्यामुळे, स्टीफन हॉकिंग ह्यांच्या थिअरीनुसार कृष्णविवरातून होणाऱ्या किरणोत्सर्जनाला स्टीफन हॉकिंग (Hawking Radiation) ह्यांचे नाव देण्यात आले.
हे सर्व कार्य करत असतनाच वयाच्या २१व्या वर्षी त्यांना एक असाध्य रोग झाला. मोटर न्यूरॉन डिसीज (MND). या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल ५५ वर्षे स्टीफन ह्यांनी मृत्यूला थोपवून धरले होते. १९८५ साली झालेल्या न्युमोनिया वरील शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आवाज देखील कायमचा गेला. गालाचा एक स्नायू आणि डाव्या हाताचे एक बोट एवढीच हालचाल करणे त्यांना शक्य होते. आणि केवळ त्याचाच उपयोग करून ते संगणकाच्या माध्यमातून बोलून संवाद साधायचे.
स्टीफन हॉकिंग ह्यांचे कार्य, संशोधन हे निदान माझ्यातरी आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे, तथापि, MND सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या माणसाने, ज्याची दोन वर्षे जगण्याची देखील शाश्वती नव्हती, अशा माणसाने तब्बल ५५ वर्षे त्या आजाराशी झुंज देत मृत्यूला थोपविणे, आणि त्याच बरोबर इतके संशोधन करणे, अनेक लेख / प्रबंध लिहिणे, संगणकीय आवाजातून व्याख्याने देणे, अशा गोष्टींमुळे स्टीफन हॉकिंग माझ्यासाठी कायम प्रेरणा स्त्रोत होते आणि राहतील.
पॅनीक
कालच्या अपघातानंतर अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. विरोधकांनी सरकारच कसे जबाबदार म्हणून काहूर माजवले आणि सरकारच्या समर्थकांनी सरकारची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी कोणा वर्मा नावाच्या माणसाची २८ सप्टेंबरची पोस्ट दाखवून आणि गोरखपूरच्या घटनेचा संदर्भ देऊन, घातपात असण्याची शक्यता देखील समोर आणली. शंभर वर्षे जुना पूल आहे पण सरकारने तो दुरुस्त करण्याचा किंवा नवीन पूल बांधण्याचा विचार देखील केला नाही म्हणून कोणी विद्यमान सरकारला दोष दिला, तर, हे सरकार येऊन फक्त तीनच वर्षे झाली आहेत आधीच्या सरकारने ६० वर्षात का नाही जनहिताची कामे केली? असाही एक सूर आळवला गेला.
पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले कि, केवळ पावसात भिजायला लागू नये म्हणून पुलावर थांबून राहणाऱ्या लोकांनी गर्दीचा जोर वाढतोय हे पाहून मार्ग मोकळा केला असता तर कदाचित अशी दुर्दैवी घटना घडली नसती. दहा मिनिटे उशिरा गेल्याने जणूकाही कोणाचा प्राणच गेला असता अशा मानसिकतेने स्टेशनवरून बाहेर पडण्याची घाई केली नसती, थोडा संयम दाखवला असता तर कदाचित अशी दुर्दैवी घटना घडली नसती.
कालच्या घटनेमुळे मला २६ जुलै २००५ च्या पुराची आणि त्यात बळी गेलेल्या अनेकांची आठवण झाली. एक नैसर्गिक आपत्ती तर एक मानव निर्मित. त्या पुरात बळी गेलेले आणि कालच्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेले दुर्दैवी लोकं, त्यांच्या मृत्यूचे एक मुख्य कारण “पॅनीक”. २६ जुलैच्या पुरात जे आपापल्या ऑफिसमधे किंवा इतर सुरक्षित ठिकाणी थांबले आणि घरी पोहोचायची घाई केली नाही ते नक्कीच सुरक्षित राहिले, पण घाबरून जाऊन ज्यांनी गडबड केली त्यातले बरेचजण वाचू शकले नाहीत. तसाच काहीसा प्रकार काल झाला. पॅनीक केवळ पॅनीकमुळे २२ जण मृत्यमुखी पडले. २६ जुलैच्या अनुभवामुळे ह्यावर्षीच्या पुरामध्ये लोकांनी घरी जाण्याची घाई केली नाही, भीतीचे वातावरण पसरू दिले नाही, परिणामी, जीवितहानी खूपच कमी झाली. कालच्या घटनेच्या अनुभवामुळे, ह्यापुढे कधी अशी गर्दी कुठे झाली तर घाई करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालण्याचा सुज्ञपणा मुंबईकर नक्कीच दाखवतील, अशी आशा आहे.
अक्षय्य तृतीया
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय्य या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच कृतयुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती साजरी केली जाते, वैशाखातल्या सर्व पर्वाचे, उत्सवांचे केंद्रित रूप म्हणजे अक्षय्य तृतीया. हि तिथी सांस्कृतिक ईतिहासात फार महत्वाची आहे.
प्राचीन काळात जगणे हि एकच मोठी समस्या होती. अन्न, पाणी आणि निसर्गाच्या प्रकोपापासून बचाव करता येईल असा निवारा शोधत, एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात अशी मानवाची वणवण होत असायची. पण शेतीचा उदय झाला आणि मानवाची वणवण थांबली. झाडाची फळे, त्यातली बीजे, त्यापासून होणारी नवी झाडे आणि त्या झाडांवर परत फळे, हा क्रम त्याच्या ध्यानात आल्यावर कसलीतरी लागवड त्याने करून पहिली, आणि ‘शेती’ चा उदय झाला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचाच होता असे मानले जाते. आज आपल्याला उपलब्ध असलेले प्राचीन वाङ्मय म्हणजे वेद. तथापि, कृषीविद्या कदाचित कालमानाने त्याहि आधीची असावी.
अक्षय्य तृतीया म्हणजे कृत युगाचा प्रारंभ. म्हणजेच कृती युगाचा प्रारंभ. मानवी संस्कृती खऱ्या अर्थाने येथून आकार घेऊ लागली. संस्कृतीचा पहिला संस्कार म्हणजे शेती. शेतीचा शोध मानवाला लागला आणि त्याची वणवण थांबली. दऱ्याखोऱ्यातून, माणूस मोकळ्या पठारांवर आला, जमीन नांगरून ओंजळभर पेरले तर गाडाभर मिळते, हे त्याला समजले. आणि माणूस शेतकरी झाला. प्राणी मारून त्यांचे मांस खाण्यापेक्षा, त्यांचा उपयोग शेतीसाठी जास्त चांगला होऊ शकतो, हे त्याला कळले. मृत पशूंच्या देहाचे अवशिष्ट वापरून शेतीसाठी खते, अवजारे, संरक्षक आवरणे सारख्या गोष्टी करता येतात हे समजल्यावर माणूस पशु संवर्धन करू लागला.
” शं नो भव दविपदे शं चतुष्पदे” [‘आम्हा द्विपदाचे आणि चातुष्पदांचे कल्याण कर’ अशी प्रार्थना ऋग्वेदात देखील आढळते.]
अशा तर्हेने संस्कृतीचा विकास होऊ लागला. सुरवातीला शिकार करून जगणारा माणूस शेती करू लागला, पशु संवर्धन करू लागला. माणूस वस्ती करून राहू लागला, त्यातुनच गावखेडी निर्माण होऊ लागली. जेंव्हा माणसाला व्यापार समजला तेंव्हा व्यापारी केंद्रे बनू लागली आणि त्यातूनच मोठी शहरे, महानगरे अस्तित्वात आली. नवनवीन माध्यमांचा, उपकरणांचा शोध लागू लागला आणि मानवी संस्कृती विस्तारू लागली. माणसाची हि प्रगती कोणी थांबवू शकणार नाही, पण जर ह्या मानवी संस्कृतीच्या आरंभाकडे पहिले तर आजच्या दिवसाचे “अक्षय्य तृतीये” चे महत्व जाणवल्याशिवाय राहणार नाही. जेंव्हा मानवाने, शेतीद्वारे आपल्या अन्नाची सोय केली, तेंव्हाच त्याने, पृथ्वीवरील आपले अस्तित्व ‘अक्षय्य’ केले. अजूनही अक्षय्य तृतीयेला नवीन वर्षाच्या शेतीचा शुभारंभ करण्याची पद्धत आहे. माणसाने कितीही प्रगती केली, नवनवीन शोध लावले, चंद्रावर, मंगळावर पोहोचला तरीही पोटाची खळगी भरायला अन्नच लागते, त्याला पर्याय नाही. म्हणजेच शेतीला पर्याय नाही.
साडेतीन मुहूर्तातील हा अर्धा मुहूर्त मानला जातो. ह्या दिवशी केलेली कामे चिरंतन होतात, संकल्प सिद्धीस जातात, असे म्हणतात, म्हणून ‘सर्वेपि सुखिन: सन्तु । सर्वे सन्तु निरामया । सर्वे म्रदाणि पश्यन्तु । मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।।’ अशी प्रार्थना करतो.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने
गेले २-३ दिवस वूमन्स डे साठी शुभेच्छा देणारे बरेच “मेसेज” आणि पोस्ट्स वाचण्यात आल्या. आणि मग एक प्रश्न नेहमी प्रमाणे सतावू लागला, ‘आपल्या देशात हे असे कुठले तरी दिवस साजरे करणे कितपत संयुक्तिक आहे?’ सध्याच्या काळात ‘वूमन्स डे’ म्हणजे एक विनोदच आहे. एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढते आहे, देशाच्या राजधानीत महिला सुरक्षित नाहीत, देशात बलात्काराचे प्रमाण वाढते आहे, अगदी १ – २ वर्षांच्या कोवळ्या मुलींवर बलात्कार होत आहेत आणि दुसरीकडे महिला दिन साजरा केला जातोय. किती परस्पर विरोधी गोष्टी आहेत ह्या. ह्याचा नीट विचार व्हायला नको का?
“वूमन्स डे” सारखेच ‘मदर डे’, ‘फादर डे’, ‘फ्रेडशिप डे’ असे अनेक ‘डे’ आहेत. मला तर मदर डे किंवा फादर डे म्हटले की आई वडिलांच्या श्राद्धाचा दिवस आठवतो. अजूनही आपल्याकडे वृद्ध आई वडील आपल्या मुलाबाळांबरोबर राहतात, आणि मुलेसुद्धा त्यांची काळजी घेत असतात. मला माहित आहे की काळ बदलत आहे, वृद्धाश्रमांची संख्या आणि तिथे दाखल होणा-यांची संख्या हळूहळू वाढत आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण तर ह्याला कारणीभूत नसेल ना? हे असले मदर डे फादर डे साजरे करणे म्हणजे, आधी आई-वडिलांपासून दूर रहायचे किंवा त्यांना वृद्धाश्रमात ठेवायचे, वर्षभर ते कसे आहेत ह्याची चौकशीपण करायची नाही आणि एक दिवस त्यांना फुले द्यायची शुभेच्छा द्यायच्या भेटवस्तू द्यायच्या, ह्याला खरेच काही अर्थ आहे का हो?
माझा काही हे असले दिवस साजरे करण्याला विरोध नाहीये. तसा विरोध करणारा मी कोण म्हणा? एखाद्या गोष्टीला विरोध करणे किंवा नंतर परत त्याच गोष्टीला पाठींबा देणे हे सगळे करायला कुठलाही राजकीय पक्ष समर्थ आहे.
आज ह्या जागतिक महिला दिना निमित्त सगळ्या पुरुषांना एक विनंती आहे की महिलांना रोज भलेही शुभेच्छा देऊ नका, नमस्कार करू नका पण त्यांचा मान मात्र नक्की राखा. त्यांचा आदर करायला शिका. पोटच्या मुलीला ओझं समजू नका. तिला चांगले शिक्षण द्या, कर्तुत्ववान बनवा. तिचे “एकदाचे लग्न लावून” मोकळे होऊ नका तर तिच्या लग्नानंतरही तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. आणि एक महत्वाचे, तुम्हाला एकवेळ, द्रौपदीची लाज राखणारा श्रीकृष्ण होता आले नाही तरी चालेल पण स्वतःचा कधी दुःशासन होऊ देऊ नका.
भारत बंद – कशासाठी कोणासाठी ?
उरी येथे धारातीर्थी पडलेल्या जवानांन श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या दिनांक २२ सप्टेंबर २०१६ रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे अशा पोस्ट्स फेसबुकवर आणि व्हॉट्सअॅपवर पाहिल्या आणि हैराण झालो आहे. ज्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना, आपले काम करत असताना देह ठेवला त्यांना श्रद्धांजली म्हणून भारत बंद? काय मूर्खपणा आहे हा? आणि बंद ठेऊन करणार काय? गावागावात लोकं जमणार, २ मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वाहणार नंतर कोणी स्थानिक कार्यकर्ते / नेतेमंडळी छोटेसे भाषण करणार आणि सगळेजण पाकिस्तानला शिव्या घालत, आधीचे आणि आत्ताचे सरकार ह्यात काहीच फरक नाहीये वगैरे बडबडत घरी जाणार, जेवणार आणि बुड वर करून झोपणार. हे काम तर भारत बंद चे आवाहन न करता देखील करता येऊ शकते ना? अरे! ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचा विचार तर करा बंद पुकारण्याआधी ….
बंद पुकारणाऱ्या लोकांना, जर जीवनावश्यक / अत्यावश्यक / सुरक्षा / बचाव सेवा देखील बंद केल्या तर चालणार आहे का? डॉक्टर दवाखान्यात / हॉस्पिटल मध्ये जाणार नाहीत, पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचारी देखील घरीच राहून भारत बंदला समर्थन देतील, कुठे आग लागलीच तर कोणी येणार नाही कारण अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी भारत बंद मध्ये सामील झालेले असतील, सीमेवरील जवान देखील भारत बंद मध्ये सामील होतील … चालणार आहे का असे झाले तर? मग ज्यांचे खरोखर हातावर पोट आहे त्यांना काम मिळणे त्यांच्यासाठी जीवनावश्यक नाहीये का? ते हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
मुळात ह्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळेल ते सांगता येत नाही पण समजा मिळाला १००% प्रतिसाद आणि झाला उद्याचा भारत बंद यशस्वी तर त्यातून काय साधणार आहे? अतिरेकी बंदुका टाकून फकिरी स्वीकारणार आहेत कि पाकिस्तान त्यांना पोसायचे बंद करणार आहे? ह्या एक दिवसाच्या बंद ने ना पाकिस्तानवर काही परिणाम होणार आहे ना भारत सरकारच्या परराष्ट्र धोरण वा संरक्षण धोरणावर, झालेच तर काही शे कोटींचे नुकसान भारतवासीयांचेच होणार आहे.
रिक्षा, टॅक्सी, बस, दुकाने, कार्यालये, शॉपिंग मॉल, उपहारगृहे, चित्रपट गृहे एक दिवस बंद झाली तर त्यांच्या मालकांचे फारसे नुकसान होणार नाहीये पण जे रोजंदारीवर काम करतात त्यांचा विचार कोण करणार? आजही देशामध्ये लाखो माणसे अशी असतील कि ज्यांना दिवसभरात काही काम नाही मिळाले तर रात्री त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला उपाशी झोपायची वेळ येत असेल. त्यांच्या भुकेने कळवळणाऱ्या लेकरांकडे पाहून ते श्रद्धांजली वाहतील की त्यांच्या मनातून “बंद” लादणाऱ्या लोकांसाठी तळतळाट निघतील, ह्याचा विचार बंद पुकारणाऱ्या लोकांनी करावा.
श्रीमंत बाजीराव पेशवे
बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० – एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव किंवा राऊ या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या ऱाऊंनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
जेमतेम ४० वर्षांच्या आयुष्यात ऱाऊंनी अतुलनिय पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २८ एप्रिल १७४० पर्यंतच्या २० वर्षात त्यांनी अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८),अहमदाबाद(१७३१) उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया जिंकल्या होत्या. वेगळ्या शब्दात सांगायचे तर राऊ १००% यशस्वी होते. वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार होते. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर वेगाने झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळू द्यायचा नाही हीच राउंची रणनीती, आपण देखील “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली होती.
मराठ्यांना नर्मदे पलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून बाजीराव पेशव्यांचे नाव नाव घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावाने मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणला. राजपूत राजांपासून मुस्लिम नबाब आणि शाह्यांना राउंनी नमवले मराठी जरीपटका डौलात उत्तर हिंदुस्तानात फडकविला.
बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यावर दिल्लीच्या बादशहाचा वजीर फरीदाबादच्या बंगश पठाणांनी हल्ला केला तेंव्हा राजा छत्रसालाने बाजीला पत्र लिहून “जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा “गजांतमोक्षाचा” हवाला देउन बाजीरावांकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेले. ही हालचाल इतकी त्वरेने केली की मराठ्यांच्या फौजा धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावांच्या झंजावातापुढे मोंगल हैराण झाले.
छत्रसालाने यानंतर राउंच्या पराक्रमावर खुष होऊन आपली एक मुलगी ‘मस्तानी’ हिचा रीतसर विवाह राउंबरोबर लावून दिला. इतिहासात पेशवाईचा उल्लेख करताना थोरल्या बाजीरावांचे नाव येते, त्यांना योग्य तो मान दिला जात नाही. ह्या महान योध्याची आपण उपेक्षा केली तरी जगाच्या इतिहासात मात्र तो तितका उपेक्षित राहिला नाही. म्हणूनच अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पालखेड (वैजापूर-औरंगाबादजवळ) येथील लढाईचा उल्लेख आहे. या लढाईत राउंनी निजामाला पाणी पाजले होते. या लढाईत अतिशय वेगवान हालचाल करून निजामाला दाती तृण धरायला लावले होते.
बाजीरावांच्या लढाईची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ते एक चांगले सेनापती होते. युद्ध कसे लढावे आणि कुठे लढावे याचे यथायोग्य ज्ञान त्यांच्याकडे होते. घोडेस्वारांचे पथक हि त्यांची मुख्य ताकद होती. त्यांच्याबरोबर सामान अगदीच कमी असे. कुटुंब वा महिला सोबत नसायच्या. रात्री झोपण्यापेक्षा जास्त हल्ला कसा करायच्या याच्या योजना ठरत. शत्रूची रसद तोडणे आणि त्याला होणारा सगळा पुरवठा तोडणे यावर भर दिला जाई. स्वतः बाजीराव घोड्यावरच जेवण करायचे अन घोड्यावरच झोप घेत असत.
२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे हा महापराक्रमी पेशवा विषमज्वराने मरण पावला.
पवित्र चातुर्मास !
जय हरी विठ्ठल!!
आज आषाढी एकादशी, म्हणजेच देवशयनी एकादशी! आज पासून, म्हणजेच आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी एकादशी) पर्यंतचा, पवित्र चातुर्मास प्रारंभ. चातुर्मास म्हणजे हिंदूंच्या व्रत-वैकल्यांचा आणि प्रमुख सण-उत्सवांचा काळ.
आषाढी एकादशी – गुरु पौर्णिमा – दिव्याची अमावस्या – नाग पंचमी – नारळी पौर्णिमा(राखी पौर्णिमा) – श्रीकृष्ण जन्माष्टमी – गौरी-गणपती – देवीचे नवरात्र – विजया दशमी – दिवाळी – कार्तिकी एकादशी. चातुर्मासातील हे सगळे महत्वाचे दिवस अगदी हातात हात घालून आल्यासारखे येतात. सगळीकडे इतके उत्साहाचे वातावरण असते, कि ह्या चार महिन्यांचा काळ कसा चटकन संपून जातो कळतच नाही.
आषाढातील पंढरपूरच्या वारीने, “जय हरी विठ्ठल” च्या घोषात सुरु झालेला हा पवित्र चातुर्मास, सर्व सणांचा मनमुराद आनंद देऊन, कार्तिकी एकादशीला “विठ्ठल विठ्ठल“ करत पुन्हा एकदा आपल्याला विठू माउलीच्या चरणाशी घेऊन जातो. सृष्टीची सुरवातही ‘तो’च आहे आणि शेवटही ‘तो’च आहे ह्याचाच जणू काही प्रत्यय आपल्याला ह्या पवित्र चातुर्मासात मिळतो.
नेमेची येतो मग पावसाळा!
ह्यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. भविष्यात पाणी टंचाईचा त्रास होऊ नये म्हणून राज्यात जलसंवर्धनाची मोहीम हाती घेतली जात आहे. भूजलस्तर उंचावण्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे घोष वाक्य झाले आहे. पण त्याचबरोबर मुंबई सारख्या महानगरात पावसाचे पाणी तुंबून वाहतूक ठप्प होणे; तुंबलेले पाणी घरा-दुकानात शिरून वित्तहानी काही वेळा जीवितहानी होणे, ह्या समस्यांकडे देखील गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
पावसामुळे मुंबई ठप्प! पावसाचे पाणी रेल्वेमार्गावर आणि रस्त्यांवर साचल्यामुळे वाहतूक बंद! असे मथळे काही मुंबईला आणि मुंबईकरांना नवीन नाहीत. काही चाकरमानी आयत्या मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेतात पण कित्येकांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करावे? कामावर जायला निघालेले असून वाटेत अडकून कामावर न पोहचू शकल्यामुळे अनेकांचे पगार कापले जातात, त्यांनी काय करावे? रोजगार उद्योगधंदे ह्यावर किती परिणाम होतो, आर्थिक नुकसान किती होते, काहीवेळा जीवित हानी देखील होते, ह्या गोष्टींचा विचार कोणीच करताना दिसत नाही. ह्या घटना दरवर्षीच्या आहेत. ह्या अशा दुर्घटना टाळण्यासाठी, पावसाळा सुरु होण्याआधीच मुंबई महापालिका, राज्यसरकार, रेल्वे प्रशासन ह्यांनी नागरिकांच्या सहकार्याने काम करून ह्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
सरकारने विशेषतः केंद्रीय रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू ह्यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे; एकवेळ नवीन गाड्या नका वाढवू पण आहेत त्या व्यवस्थित चालू शकतील ह्याकडे लक्ष दिले पाहिजे; हे दरवर्षीचे गोंधळ आहेत. २-४ तास सलग पाऊस पडला कि रेल्वे ठप्प होते, आणि पर्यायाने रस्त्यावरील वाहतूक वाढते पण रस्त्यांची देखील तीच अवस्था आहे, सगळीकडे वाहतुक ठप्प होते; कुठे गुडघाभर तर कुठे कमरेपर्यंत पाणी साचते; थोड्याश्या पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही, हि कसली नागरी सुव्यवस्था? पाण्याचा निचरा होऊ शकेल अशी गटारे धड नाहीत, लगेच तुंबतात? हे असे थोड्याश्या पावसात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होऊ नये ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची? आमदारांची कि स्थानिक नगरसेवक ह्यांची? राज्य सरकारची कि महापालिकेची? त्यांची तर आहेच पण सगळ्यात जास्त जबाबदारी आहे ती नागरिकांची! पाण्याचा निचरा करणारी गटारे उगाच तुंबत नाहीत, नागरिकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर घन कचरा त्यात अडकतो म्हणून तुंबतात. रस्त्यांवर आणि विशेषतः रेल्वेमार्गांवर कचरा आपसूक निर्माण होत नाही, तो नागरिकांनीच केलेला असतो. वर्षभर त्या बाबतीत बेफिकीरीने वागले की त्यांची किंमत पावसाळ्यात अशा पद्धतीने चुकवावी लागते. रस्त्यात थुंकू नये, कचरा टाकू नये, लोकलमध्ये आणि लोकलमधून कचरा टाकू नये ह्याचे कोणालाही भान नसते. बिनदिक्कतपणे कुठेही काहीही फेकले जाते.
“थुंकू नये” “कचरा टाकू नये” अशा सूचना लिहाव्या लागतात ह्यातच नागरिकांच्या सुजाणतेचा बोजवारा उडालेला दिसून येतो. आणि तेही स्वाभाविकच आहे म्हणा, शालेय अभ्यासक्रमात देखील नागरिकशास्त्र हा फक्त वीस गुणांचा विषय असायचा, अन् तो देखील ऑप्शनला टाकला तरी चालायचे. सध्यातर नागरिकशास्त्र हा विषयच नाहीये म्हणे. पालकांनी आणि शिक्षकांनीच हा विषय ऑप्शनला टाकलेला असेल तर नव्या पिढीला कोण आणि काय शिकवणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?