उरी येथे धारातीर्थी पडलेल्या जवानांन श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या दिनांक २२ सप्टेंबर २०१६ रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे अशा पोस्ट्स फेसबुकवर आणि व्हॉट्सअॅपवर पाहिल्या आणि हैराण झालो आहे. ज्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना, आपले काम करत असताना देह ठेवला त्यांना श्रद्धांजली म्हणून भारत बंद? काय मूर्खपणा आहे हा? आणि बंद ठेऊन करणार काय? गावागावात लोकं जमणार, २ मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वाहणार नंतर कोणी स्थानिक कार्यकर्ते / नेतेमंडळी छोटेसे भाषण करणार आणि सगळेजण पाकिस्तानला शिव्या घालत, आधीचे आणि आत्ताचे सरकार ह्यात काहीच फरक नाहीये वगैरे बडबडत घरी जाणार, जेवणार आणि बुड वर करून झोपणार. हे काम तर भारत बंद चे आवाहन न करता देखील करता येऊ शकते ना? अरे! ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचा विचार तर करा बंद पुकारण्याआधी ….
बंद पुकारणाऱ्या लोकांना, जर जीवनावश्यक / अत्यावश्यक / सुरक्षा / बचाव सेवा देखील बंद केल्या तर चालणार आहे का? डॉक्टर दवाखान्यात / हॉस्पिटल मध्ये जाणार नाहीत, पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचारी देखील घरीच राहून भारत बंदला समर्थन देतील, कुठे आग लागलीच तर कोणी येणार नाही कारण अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी भारत बंद मध्ये सामील झालेले असतील, सीमेवरील जवान देखील भारत बंद मध्ये सामील होतील … चालणार आहे का असे झाले तर? मग ज्यांचे खरोखर हातावर पोट आहे त्यांना काम मिळणे त्यांच्यासाठी जीवनावश्यक नाहीये का? ते हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
मुळात ह्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळेल ते सांगता येत नाही पण समजा मिळाला १००% प्रतिसाद आणि झाला उद्याचा भारत बंद यशस्वी तर त्यातून काय साधणार आहे? अतिरेकी बंदुका टाकून फकिरी स्वीकारणार आहेत कि पाकिस्तान त्यांना पोसायचे बंद करणार आहे? ह्या एक दिवसाच्या बंद ने ना पाकिस्तानवर काही परिणाम होणार आहे ना भारत सरकारच्या परराष्ट्र धोरण वा संरक्षण धोरणावर, झालेच तर काही शे कोटींचे नुकसान भारतवासीयांचेच होणार आहे.
रिक्षा, टॅक्सी, बस, दुकाने, कार्यालये, शॉपिंग मॉल, उपहारगृहे, चित्रपट गृहे एक दिवस बंद झाली तर त्यांच्या मालकांचे फारसे नुकसान होणार नाहीये पण जे रोजंदारीवर काम करतात त्यांचा विचार कोण करणार? आजही देशामध्ये लाखो माणसे अशी असतील कि ज्यांना दिवसभरात काही काम नाही मिळाले तर रात्री त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला उपाशी झोपायची वेळ येत असेल. त्यांच्या भुकेने कळवळणाऱ्या लेकरांकडे पाहून ते श्रद्धांजली वाहतील की त्यांच्या मनातून “बंद” लादणाऱ्या लोकांसाठी तळतळाट निघतील, ह्याचा विचार बंद पुकारणाऱ्या लोकांनी करावा.