भारतासह जगभर प्रचलित असलेली ग्रेगोरिअन कालगणना (१ जाने ते ३१ डिसें) हि इ.स. १५९२ पासून वापरत आली. तथापि, त्या कालगणनेला कोणताच शास्त्रीय / खगोलीय आधार नाहीये. सुरवातीच्या काळात १० महिन्यांचे, ३०४ दिवसांचे वर्ष होते, नंतरच्या काळात रोमन सम्राटांनी आपली मर्जीने त्यात बदल केले. ज्युलिअस सीझरच्या नावे ३१ दिवसांचा जुलै महिना आणि ऑगस्टस च्या नावे ३१ दिवसांचा ऑगस्ट महिना आला. पण हे करत असताना, महिन्यांच्या नावाकडे देखील दुर्लक्ष झाले. जुलै आणि ऑगस्ट महिने घुसवायच्या आधी सप्टेंबर म्हणजे सातवा महिना होता ऑक्टोबर आठवा नोव्हेंबर नउवा, आणि डिसेंबर दहावा महिना होता. आता सप्टेंबर हा नउवा महिना आहे. कुठल्या महिन्यात किती दिवस आणि का ह्याला काही नियम / शास्त्रीय आधार दिसत नाही.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण आपल्या राष्ट्रीय भावना स्पष्ट करण्यासाठी अनेक संकल्पना स्विकारल्या. यात राष्ट्रभाषा, राष्ट्रीय ध्वज याचसोबत स्वतंत्र शास्त्रशुध्द वैज्ञानिक कालगणना स्विकारण्याचे ठरले. पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी नोव्हेंबर १९५२ मध्ये सुप्रसिध्द खगोल वैज्ञानिक डॉ. मेघनाद शहा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कालगणना पुर्नरचना समिती नेमली.
पृथ्वीच्या विषुवृत्ताच्या समपातळीत समकेंद्रीय खगोलीय महावर्तुळ म्हणजे वैषुविक वृत्त, आयानिक वृत्त ही दोन ठिकाणी एकमेकास छेदतात त्या अंतराळातील छेदन बिंदूस संपात बिंदू म्हणतात. या बिंदूवर सूर्य आला की पृथ्वीवर दिवस व रात्रीचा कालावधी अगदीच समसमान असतो. भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक १ चैत्र या दिवशी सूर्य हा वसंत संपात बिंदूवर असतो. म्हणून या दिवशी दिवस आणि रात्रीचा कालावधी अगदी समसमान असतो. याच दिवशी वसंतऋतू प्रारंभ होतो. या सर्व शास्त्रीय आणि शुध्द खगोलशास्त्राच्या दृष्टीने हाच दिवस वर्षाचा प्रारंभ करण्याचा सर्वाधिक योग्य दिवस असल्याचे स्पष्ट दिसते व याच आधारावरून डॉ. मेघनाद शहा समितीने भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेचा हा दिवस वर्षाचा प्रारंभ दिवस म्हणून निवडला.
सूर्याच्या भासमान मार्गावरील वसंत संपात ते शरद संपात या दोन बिंदूतील प्रवासाला सूर्याला १८५ दिवस लागतात. तर शरद संपात ते वसंत संपात या प्रवासाला १८० दिवस लागतात. त्यानुसार भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेत प्रारंभीचे वैशाख ते भाद्रपद हे ५ महिने ३१ दिवसांचे असून उर्वरित अश्विन ते फाल्गुन हे ६ महिने ३० दिवसांचे आहेत. दर चार वर्षांनी (लीप इअर) चैत्र महिन्यात ३१ दिवस असतात वर ते वर्ष इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २२ मार्च ऐवजी २१ मार्च पासून सुरु होते.
भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेच्या वर्षारंभाचा आज पहिला दिवस, भारतीय राष्ट्रीय सौर दि.१ चैत्र शके १९४० ही आपली राष्ट्रीय तारीख परंतु आज आपल्या देशात अनेकांना हे माहितच नाही. भारत सरकारने दि. २२ मार्च १९५७ या इंग्रजी दिनांकाच्या दिवशी आपली स्वत:ची शुध्द स्वदेशी आणि शुध्द खगोल वैज्ञानिक भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक १ चैत्र शके १८७९ रोजी अधिकृतपणे स्विकारलेली होती.
हिंदु पंचांग हे चंद्राच्या आकाशातील स्थितीवर आधारलेले आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतांना रोज एका नक्षत्रातून भ्रमण करतो. त्यानुसार एका महिन्यात २७.३ दिवसात तो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. चंद्र महिन्याच्या पोर्णिमेच्या दिवशी ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचे नांव त्या महिन्याला दिलेले आहे. उदा:- चैत्र महिन्यात पोर्णिमेला चंद्र हा चित्रा नक्षत्रात असतो तर वैशाख महिन्यात तो विशाखा नक्षत्रात असतो. आपण आपले सर्व सण व उत्सव चंद्र भ्रमणावरील नक्षत्र व तिथीनुसार हिंदु पंचांगात दिल्याप्रमाणे साजरे करतो. आपले सर्व ऋतु हे सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून आहेत तर सण आणि उत्सव हे चंद्र नक्षत्र व तिथीवर अवलंबून आहेत. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी हिंदु पंचांग तिथी व नक्षत्रानुसार सण व उत्सव साजरे करावेत. मात्र आपल्या रोजच्या व्यवहारात सूर्य भ्रमणावर आधारलेली भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक वापरणे योग्य आहे.