Brief History of Stephen Hawking

8 January 1942 – 14 March 2018

एक ब्रिटीश सैद्धांतिक भौतिकशास्त्र (Theoretical physics), सैद्धांतिक विश्वनिर्मिती (Theoretical Cosmology) अशा सामान्य माणसासाठी अगम्य असणाऱ्या विषयातला एक जागतिक कीर्तीचा विद्वान शास्त्रज्ञ आज हरपला.

स्टीफन हॉकिंग ह्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी लक्षात राहण्यासारख्या आहेत, अगदी त्यांची जन्म तारीख आणि गॅलिलिओ गॅलिलि ह्या महान शास्त्रज्ञाच्या मृत्युची तारीख एकच ८ जानेवारी. फरक फक्त ३०० वर्षांचा. गॅलिलिओचा मृत्यू १६४२ मधे झाला आणि स्टीफनचा जन्म १९४२ मधे झाला. आज १४ मार्च २०१८ ला त्याचा मृत्यू झाला आणि आज अल्बर्ट आईनस्टाईनची १३९वी जयंती आहे.

प्रख्यात गणितज्ञ  रॉजर पेनरोज यांनी, तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष एकदा आपल्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला. १९६२ मधे केंब्रिज विद्यापीठातल्या Applied Mathematics and Theoretical Physics विभागात विश्वनिर्मिती बद्दल त्याने आपले संशोधन सुरु केले आणि या प्रबंधावर डॉक्टरेट मिळवली.

डॉक्टरेट मिळायच्या आधीच १९६४ मधे एका व्याख्याना दरम्यान, ब्रिटीश शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉइल आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत नारळीकर ह्यांच्या कार्याला आव्हान दिल्यामुळे स्टीफन हॉकिंग चर्चेत आले. त्या क्षेत्रातील तज्ञांनी तर त्याची दखल घेतली होतीच पण जगभरातील सामान्य माणसाला स्टीफन हॉकिंग लक्षात आले ते त्यांच्या “Brief History of Time” ह्या पुस्तकामुळे.

नंतर स्टीफन हॉकिंग ह्यांनी कृष्णविवर ह्या विषयावर संशोधन करायला सुरवात केली. क्वांटम मेकॅनीक्स आणि आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत ह्याची सांगड घालून काही गृहिते मांडली. प्रत्यक्षात MND मुळे शारीरिक हालचाली करणे अवघड होत होते तरी अशी क्लिष्ट गणिते केवळ मनात करून त्यांनी आपल्या ह्या प्रबंधावर कार्य सुरु ठेवले. सुरवातीला अनेक तज्ञांनी ह्या प्रबंधाला विरोध केला होता पण नंतर ती मते पटल्यामुळे, स्टीफन हॉकिंग ह्यांच्या थिअरीनुसार कृष्णविवरातून होणाऱ्या किरणोत्सर्जनाला स्टीफन हॉकिंग (Hawking Radiation) ह्यांचे नाव देण्यात आले.

हे सर्व कार्य करत असतनाच वयाच्या २१व्या वर्षी त्यांना एक असाध्य रोग झाला. मोटर न्यूरॉन डिसीज (MND). या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले.  पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल ५५ वर्षे स्टीफन ह्यांनी मृत्यूला थोपवून धरले होते. १९८५ साली झालेल्या न्युमोनिया वरील शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आवाज देखील कायमचा गेला. गालाचा एक स्नायू आणि डाव्या हाताचे एक बोट एवढीच हालचाल करणे त्यांना शक्य होते. आणि केवळ त्याचाच उपयोग करून ते संगणकाच्या माध्यमातून बोलून संवाद साधायचे.

स्टीफन हॉकिंग ह्यांचे कार्य, संशोधन हे निदान माझ्यातरी आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे, तथापि, MND सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या माणसाने, ज्याची दोन वर्षे जगण्याची देखील शाश्वती नव्हती, अशा माणसाने तब्बल ५५ वर्षे त्या आजाराशी झुंज देत मृत्यूला थोपविणे, आणि त्याच बरोबर इतके संशोधन करणे, अनेक लेख / प्रबंध लिहिणे, संगणकीय आवाजातून व्याख्याने देणे, अशा गोष्टींमुळे स्टीफन हॉकिंग माझ्यासाठी कायम प्रेरणा स्त्रोत होते आणि राहतील.

 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने

गेले २-३ दिवस वूमन्स डे साठी शुभेच्छा देणारे बरेच “मेसेज” आणि पोस्ट्स वाचण्यात आल्या. आणि मग एक प्रश्न नेहमी प्रमाणे सतावू लागला, ‘आपल्या देशात हे असे कुठले तरी दिवस साजरे करणे कितपत संयुक्तिक आहे?’  सध्याच्या काळात ‘वूमन्स डे’ म्हणजे एक विनोदच आहे. एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढते आहे, देशाच्या राजधानीत महिला सुरक्षित नाहीत, देशात बलात्काराचे प्रमाण वाढते आहे, अगदी १ – २ वर्षांच्या कोवळ्या मुलींवर बलात्कार होत आहेत आणि दुसरीकडे महिला दिन साजरा केला जातोय. किती परस्पर विरोधी गोष्टी आहेत ह्या. ह्याचा नीट विचार व्हायला नको का?

“वूमन्स डे” सारखेच ‘मदर डे’, ‘फादर डे’, ‘फ्रेडशिप डे’  असे अनेक ‘डे’ आहेत. मला तर मदर डे किंवा फादर डे म्हटले की आई वडिलांच्या श्राद्धाचा दिवस आठवतो. अजूनही आपल्याकडे वृद्ध आई वडील आपल्या मुलाबाळांबरोबर राहतात, आणि मुलेसुद्धा त्यांची काळजी घेत असतात. मला माहित आहे की काळ   बदलत आहे, वृद्धाश्रमांची संख्या आणि तिथे दाखल होणा-यांची संख्या हळूहळू वाढत आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण तर ह्याला कारणीभूत नसेल ना? हे असले मदर डे फादर डे साजरे करणे म्हणजे, आधी आई-वडिलांपासून दूर रहायचे किंवा त्यांना वृद्धाश्रमात ठेवायचे, वर्षभर ते कसे आहेत ह्याची चौकशीपण करायची नाही आणि एक दिवस त्यांना फुले द्यायची शुभेच्छा द्यायच्या भेटवस्तू द्यायच्या, ह्याला खरेच काही अर्थ आहे का हो?

माझा काही हे असले दिवस साजरे करण्याला विरोध नाहीये. तसा विरोध करणारा मी कोण म्हणा? एखाद्या गोष्टीला विरोध करणे किंवा नंतर परत त्याच गोष्टीला पाठींबा देणे हे सगळे करायला कुठलाही राजकीय पक्ष समर्थ आहे.

आज ह्या जागतिक महिला दिना निमित्त सगळ्या पुरुषांना एक विनंती आहे की महिलांना रोज भलेही शुभेच्छा देऊ नका, नमस्कार करू नका पण त्यांचा मान मात्र नक्की राखा. त्यांचा आदर करायला शिका. पोटच्या मुलीला ओझं समजू नका. तिला चांगले शिक्षण द्या, कर्तुत्ववान बनवा. तिचे “एकदाचे लग्न लावून” मोकळे होऊ नका तर तिच्या लग्नानंतरही तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. आणि एक महत्वाचे, तुम्हाला एकवेळ, द्रौपदीची लाज राखणारा श्रीकृष्ण होता आले नाही तरी चालेल पण स्वतःचा कधी दुःशासन होऊ देऊ नका.